शेवडे परिवाराचा आणि आमचा जवळपास 30 वर्षांचा ऋणानुबंध….
ऋणानुबंध या अर्थाने की या परिवाराचे आमच्यावर इतके ऋण आहेत की ते या जन्मी तर नाहीच पण सात जन्मही त्यांच्याशी कृतज्ञतापूर्वक संबंध ठेवून राहिलो तरी ते फिटणे अशक्य आहे. लोकेश दादाची आणि माझी पहिली भेट दै. गांवकरीच्या मधुरा पुरवणीच्या एका कार्यक्रमात झाली. तेव्हा मी 20 वर्षांचा होतो. कार्यक्रमात काही डॉक्टर्स बोलले (बहुदा ते मेंदूतज्ञ होते). त्या कार्यक्रमात व्यसनाधिनता आणि आपला मेंदू अशा काहीतरी विषयावर मान्यवर वाचक म्हणून लोकेश दादाही बोलला.
कार्यक्रमानंतर आमच्या जुजबी गप्पा झाल्या मग त्याच्या एस्टीम या नव्याकोऱ्या गाडीत त्याने मला अभिनेते सदानंद जोशी यांच्याकडे सोडले. जाताना साधीच चौकशी केली, ती पण इतक्या आपुलकीने की मला खूपच वेगळे आणि छान वाटले. त्यावेळी इस्टीम नुकतीच बाजारात आली होती. “इतक्या भारी गाडीत मी पहिल्यांदाच बसलो”, हे मी तारुण्यसुलभ अप्रुपाने त्याला सांगितले तेव्हा, “इतके काही विशेष नाही रे! तुही घेशील यापेक्षा मोठी गाडी” अशा तोंडभरून शुभेच्छा दिल्या. त्यादिवशी कॅनडा कॉर्नरला इस्टीम थांबवून त्याने आणि मी बऱ्याच गप्पा मारल्या. मी गंभीरपणे मराठी साहित्य वाचतो हे कळल्यावर त्याचे आणि माझे पहिल्याच भेटीत घट्ट मैत्र जुळले ते आजतागायत कायम आहे. आमच्या वयात 15-17 वर्षांचे अंतर असले तरी पुढे पुस्तके आणि नाटक हा आम्हाला जोडणारा दुवा ठरला. त्याकाळी त्याच्याबरोबर बाप आणि मुलगा अशी दोनच पात्रे असलेली अतुल पेठेची ‘यात्रा’ ही एकांकिका करावी अशी माझी इच्छा होती पण ते राहून गेले.
दररोज गोल्फ क्लबला 10 फेऱ्या भल्या पहाटे पळत मारून कमावलेले शरीर, खर्जातला आवाज, पार्ल्यात जन्मल्यामुळे आपोआप मिळालेला आणि वाढवलेला रुबाब, अफलातून ड्रेस सेन्स, करडे-पांढरे केस, पुरुषांचा क्वचित असणारा अत्यंत उजळ रंग, सतत – सदासर्वकाळ जेत्याची असलेली देहबोली, कुठेही जाताना दमदार पावलं टाकत जाण्याची सवय, लग्नसमारंभात सोडा अगदी स्मशानातही हा माणूस अनोळखी माणसांचे लक्ष वेधून घेतो. मराठी भाषेवरची मजबूत पकड आणि कोट्या करण्याची अनिर्बंध हौस त्याच्या वेगळेपणात भर घालते.
माझे एक क्लायंट आणि आमचे ज्येष्ठ स्नेही सुहास दंडे नेहमी लोकेशचा उल्लेख ‘ A complete man ‘ असा करतात.
खरोखर त्याच्या रूपाने रेमंडला इतका रुबाबदार brand ambassador का मिळाला नाही हे एक कोडंच आहे.
आमची ओळख झाल्याबरोबर त्याने माझी ‘आजचा सुधारक’ ची वर्गणी भरली. माझ्याकडे आजचा सुधारक यायला लागला, त्यावर आमच्या चर्चा रंगू लागल्या. नंतर त्यानं मला कुरुंदकरांचे शिवरात्र हे पुस्तक दिलं आणि नंतर जीए कुलकर्णींचं प्रवासी, इस्कीलार आणि पुढे वेध संगीत नाटकांचा हा जाडजूड ग्रंथ भेट म्हणून दिला. मला खूपच भारी वाटायचं. पुढे वाचणाऱ्या प्रत्येकालाच तो ही चार पुस्तकं ओळीने देतो आणि आजचा सुधारकची वर्गणी भरतो हे लक्षात आल्यावर ‘शेवड्यांचा फोर कोर्स वाचन डोस’ असा मी त्याचा गमतीने उल्लेख करत असे.
दरम्यानच्या काळात औद्योगिक क्षेत्रात लोकेश शेवडे, देवेश शेवडे आणि त्यांची इतर भावंडे अतिशय वेगाने दमदार घोडदौड करत होते. स्टोअरवेल अर्थात रोटोमॅटिक कंटेनर्स अतिशय वेगाने वाढत होती आणि सरगमही…. (त्याअगोदर पहिल्या पिढीतले उद्योजक असल्याने त्यांनी काही मोठे धक्केही पचवले होते.)
सतत नव्याचा शोध, कठोर आत्मपरीक्षण आणि अफाट जनसंपर्क या जोरावर लोकेश आणि देवेश हे शेवडे बंधू इतके मोठे होत होते की त्यांनी माझ्यासारख्या लोकांना मिनिटभरही वेळ देण्याची आवश्यकता नव्हती, पण आठवड्यातून साधारण तीन वेळेला त्यांच्या ‘कुठेतरी’ या बंगल्यावर आम्ही निवडक मित्रमंडळी जेवायला हमखास जमत असू …आणि साधारण दोन-अडीचाव्या दिवशी लोकेशचा फोन येत असे “अरे, काय बरेच दिवस झाले तुम्ही आला नाहीत जेवायला …आज येता का? तो अमुक तमुक मोठा माणूस येतो आहे”. शेवड्यांच्या घरी साहित्य, कला – संगीत या क्षेत्रातली बडी बडी मंडळी मुक्कामाला येतात. लोकेशची आई म्हणजे आमच्या (कै.) अम्माजी या मूळच्या ग्वाल्हेरच्या…आणि शास्त्रीय संगीतात चांगल्यापैकी नाव मिळवलेल्या असल्यामुळे आणि लोकेश दादाच्या अफाट जनसंपर्कामुळे त्यांच्या घरी कलाक्षेत्रातल्या मंडळींचा कायम राबता असे.
मी आणि माझी पत्नी मनीषा आम्ही दोघेही शाकाहारी…आमच्या दोघांसाठीच वेगळा स्वयंपाक बनवलेला असे म्हणजे अजूनही असतो. लोकेशचे मामा हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मश्री अरविंदकुमार माईनकर येणार असतील तर पर्वणीच…कधी नेमाडे तर कधी विश्वास पाटील मग मी, मनीषा आणि मंदार भारदे आम्ही जाणार हे ठरलेले….पुढे पुढे मिलिंद मुरुगकर, अख्तर, मृणालताई,अश्विनी, दीप्ती,अजित जोशी असा गोतावळा जमला की मैफल सुरू होते…गप्पांना विषयांचे बंधन नाही आणि वादांना तर तोटाच नाही.
सीटीबीटी अर्थात अणू करारापासून तर मराठीतील सर्वश्रेष्ठ कादंबरीकार कोण अशा अनेक विषयीच्या वाटेल त्या चर्चा घडत असतात. खरंतर मी आणि मनीषा आम्ही निम्न मध्यम वर्गातले…सुरुवातीला शेवड्यांचं अगदी सिनेमातल्यासारखं घर आणि तिथल्या डायनिंग टेबलावर बसताना थोडा संकोच वाटत असे, मात्र पहिल्या एक दोन वेळानंतरच हा संकोच मागे पडला. चर्चा करताना अथवा वाद घालताना आपण या कुटुंबाबाहेरचे आहोत असे आम्हाला कधीही वाटले नाही अर्थात याचे श्रेय अम्माजींना आणि देवेश काकालाही द्यायला हवे. लोकेशच्या जवळचे आहोत म्हणजे आम्ही त्यांचेच आहोत याच पद्धतीने पहिल्या दिवसापासून त्यांनी आम्हाला जवळ केले…
“देवेश काकाचा मीतभाषी, प्रेमळ स्वभाव, मऊ आवाज, सतत दुसऱ्याला सन्मान देऊन उत्सुकतेने त्याच्या कामाबद्दल, कौशल्याबद्दल बोलण्याची आणि त्याला आत्मविश्वास देण्याची त्याची पद्धत तर लाजवाब आहे. सरगमचा कारभार सांभाळत असताना या सगळ्या जेवणासकटच्या मैफिलींचं संपूर्ण यजमानपद कायमच देवेश काकाने स्वतःकडे घेतलं आहे. अगदी घरी आल्या आल्या द्यायच्या वेलकम ड्रिंक्सपासून तर जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम – डेझर्टपर्यंत सगळी तयारी स्वतः करण्याची त्याची लगबग आम्ही असंख्य वेळा अनुभवली आहे.”
या संपूर्ण कुटुंबाचा आम्ही एक भाग आहोत याचा आम्हा दोघांनाही विलक्षण अभिमान आहे. आमच्या वयाच्या इतर क्षेत्रातल्या आमच्या सगळ्या मित्रमंडळींना हे आमचं मोठं घर आणि आमचे हे मोठे भाऊ ठाऊक आहेत अगदी आमच्या क्लायंटलासुद्धा…यातच सगळं आलं!
हा आपुलकीचा धागा आता पुढच्या पिढ्यांमध्ये येऊ पाहतो आहे. स्निग्धा आता सरगमची डायरेक्टर झाली आहे मात्र ती अगदी चौथी पाचवीत असल्यापासून आमचं त्यांच्याकडे जाणं येणं आहे. आनंदा दादा- मनीषाताई म्हणून तोंडभरून प्रत्येक वेळा तिने केलेलं स्वागत आणि तिच्याबरोबरचा धमाकेदार दंगा आम्ही कायमच एन्जॉय करत आलो आहोत. आमची ही पुतणी खरंतर अतिशय हुशार आणि कर्तृत्ववान! सुरुवातीच्या काळात जेव्हा त्यांच्या फॅक्टरीमध्ये फ्लोअरवर जायची तेव्हा सोनचाफ्यासारखी नाजूक ही राजकन्येसारखी दिसणारी मुलगी स्वतः जांभळे कपडे घालून सगळ्या वर्कर्सबरोबर भट्टीजवळ काम करायची याचं आम्हाला आजही अप्रूप वाटतं. आमच्या अनेक कार्यक्रमात तिने इंग्रजी सूत्रसंचालकाची भूमिका वठवली आहे. आपला सगळा व्याप सांभाळून, काम सांभाळून त्याचं कुठेही आमच्यावर दडपण येऊ न देता वेळेवर सांगितलेली गोष्ट करणे हे तिला सहजतेने जमलेलं आहे. आम्हा दोघांच्याही इंग्रजीची बोंब असल्यामुळे आमच्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या व्यवसायात जेव्हा जेव्हा इंग्रजीमुळे स्पीडब्रेकर येतो तेव्हा आम्ही स्निग्धाकडे धाव घेतो आणि कितीही कामात असली तरी भाषांतर करून दे अथवा आमचं आम्ही लिहिलेलं तोडकंमोडकं इंग्रजी सुधारून दे किंवा एखादं लेटर ड्राफ्ट करून दे किंवा मग प्रमुख ठिकाणी आमची माहिती इंग्रजीत पाठवायची असेल तर हक्काने आम्ही तिला सांगत आलो आहोत आणि कधीही जराही कुरकुर न करता अगदी वेळेवर तिने हे सगळं केलं आहे.
लोकेश दादाची जेवढी बोलणी मी खाल्ली असतील तेवढी कदाचित कुणीच खाल्ली नसतील. मुळात मला व्यवसायातलं काहीही कळत नाही हे त्याचं अत्यंत आवडतं आणि खरं म्हणजे वस्तुस्थिती दर्शक मत…त्यामुळे व्यवसायात अथवा व्यक्तिगत आयुष्यात मी ज्या ज्या चुका केल्या त्या त्यावेळी लोकेश दादाची मला विलक्षण पडी पडलेली आहे आणि नात्याचं नितळपण इतकं श्रेष्ठ की माझ्या बायकोलाही ओरडायला त्याला काहीच वाटत नाही. स्निग्धा आणि मुग्धा तशी मनीषा…असं बहुदा त्याच्या मनात फिट्ट असावं. आम्हा दोघांना समोर बसवून तुम्ही कसे मूर्ख आहात हे आम्हाला तो अतिशय मुक्तछंदात पटवून देतो मात्र आमच्या विषयीचे ममत्व इतकं थोर की आम्ही केलेली प्रत्येक चूक, कठीण काळ, एक अतिशय भलं मोठ संकट.. या प्रत्येक वेळी वडिलांच्या मायेने, आस्थेने आणि अधिकाराने तो ठामपणे उभा राहिला आहे. किंबहुना या सगळ्यातून आम्हाला सहीसलामत पैलतीरावर पोहोचवेपर्यंत तो कधीही स्वस्थ बसला नाही. एकदा एका मोठ्या संकटात तर जवळपास महिनाभर माझ्या चुकीमुळे त्याला त्याची सर्व कामं बाजूला ठेवून माझ्या सगळ्या चुका निस्तराव्या लागल्या पण मी पुन्हा व्यवसायात उभा राहून बऱ्यापैकी काम करायला लागल्यावर वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या स्वरूपात कायम आम्हाला कायम शाबासकी मिळत राहिली. मी दिवाळी अंक काढायचो त्यावेळी माझ्या दिवाळी अंकात कुसुमाग्रजांपासून डहाकेंपर्यंत आणि माशेलकरांपासून ते इंदिरा संतांपर्यंत सगळेजण लिहितात हे तो फार कौतुकाने त्याच्या आप्तस्वकीयांना आणि नातेवाईकांना सांगायचा. त्याच्या सगळ्या वर्तुळात त्यामुळे मला अगदी सहज प्रवेश मिळत असे अर्थात ‘याचा तुला काहीच उपयोग करून घेता येत नाही’ हे पुन्हा त्याचं लाडके मत…पण ते असो..
आमचा मार्केटिंग कन्सल्टन्सी आणि इव्हेंट्सचा व्यवसाय आहे.
आता महाराष्ट्रात 10-12 जिल्ह्यात कामाचा विस्तार झाला आहे, अनेक अनुभवातुन तावून सुलाखून निघाल्यावर बऱ्यापैकी काम करतो आहोत. आता कामाचा स्केल बदलला, तंत्रज्ञानाच्या मदतीने गोष्टी काहीशा सोप्या झाल्या…तरी मागे वळून पाहताना शेवडे कुटुंबाबरोबरचे दोन अनुभव मात्र कायम लक्षात राहतील…सरगमच्या सिन्नर प्लांटचा शुभारंभाचा कार्यक्रम होता. आम्ही नुकतीच कार्यक्रम संयोजन व्यवसायाला सुरुवात केली होती. कार्यक्रम घरचा असल्याने जास्तच टेंशन असतं तसं याही कार्यक्रमाचं टेन्शन होतंच. डिजिटल यंत्रणा यायच्या आधीचा म्हणजे साधारण 20 वर्षांपूर्वीची हा काळ…इंडस्ट्रीयल प्लांटच्या उदघाटनाचा हा आमचा पहिला अनुभव होता…प्लांटचे उदघाटन असल्याने satin ची लाल रिबन आणली होती… बाकी सगळी तयारी व्यवस्थित करून आम्ही उदघाटनाच्या अगदी थोडावेळ आधी रिबन बांधायची म्हणून थांबलो होतो, तेव्हा लक्षात आलं की इंडस्ट्रीयल प्लांटच्या मानानं ही रिबन बांधल्यावर लहान दिसणार आहे. रुंदीला भरपूर मोठी असली तरी ती उठून दिसणार नाही. हातात वेळ नव्हताच, मग आणलेल्या सजावटीच्या सामानात satinचं एक फुल सापडलं..मग रिबन बांधून बरोबर मध्यभागी ते फुल आम्ही लावलं (त्याचा फोटो कदाचित असेल)…आमची ही गडबड लक्षात येऊनही लोकेश दादा किंवा देवेश काकाने जरासुद्धा नाराजी दाखवली नाही…त्यानंतर अलीकडे काही वर्षांपूर्वी बहुतेक सरगमच्या ISO सर्टिफिकेशनचे सेलिब्रेशन होते, तेव्हाची अत्यंत आनंददायक गोष्ट स्निग्धा डायरेक्ट झाली होती आणि तिच्या देखरेखीखाली हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला…
आमच्या सुदैवाने हा कार्यक्रम दृष्ट लागण्याजोगा झाला. त्याचं सारं श्रेय शेवडे कुटुंबियांनी आम्हाला भरभरून दिलं हे सांगणे न लगे!
लोकेशदादा
साहित्य – संगीत यावर विलक्षण प्रेम असलेला, स्वतः उत्तम संगीतकार असलेला आणि अलीकडे नाटककार म्हणून आपलं कसब पणाला लावत असलेला, इतरांच्या मदतीला कायम बोलवण्याआधी धावून जाणारा, प्रत्येक ठिकाणी जिथे मित्रमंडळींना काहीही अडचण – प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी आपला सगळा जनसंपर्क पणाला लावणारा, वसंत व्याख्यानमालेपासून साहित्य संमेलनाच्या संयोजनापर्यंत आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानपासून वाचनालयापर्यंत सर्व सांस्कृतिक – सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय असलेला हा असा लोक विलक्षण माणूस या जन्मी आपल्याला पहायला मिळाला हेच आपलं नशीब हे मी वारंवार सांगत आलो आहे. त्याची विचार करण्याची धाटणी खूपच वेगळी आहे. अलीकडच्या काळात बदललेल्या सामाजिक वातावरणामुळे तो विलक्षण अस्वस्थ आहे, पण सर्व विचारधारेतील माणसांशी असलेले व्यक्तिगत संबंध जपण्यासाठी आपण खूप लवचिक असलं पाहिजे किंबहुना कितीही वेळा कमीपणा घेतला तरी आपल्याला वाईट वाटता कामा नये हे त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे. अत्यंत प्रतिथयश उद्योजक, विचक्षण कलारसिक, वयाच्या पासष्टीतही उत्साह एखाद्या पंचवीशीतल्या तरुणाला लाजवेल असा….
“जागतिकीकरणानंतर बदललेल्या जगाचा अतिशय सखोल विचार करणारा आणि प्रत्येकाने आपला व्यवसाय करताना जागतिक घडामोडींचा संदर्भ सतत घेतला पाहिजे असा आग्रही विचार असणारा, प्रसंगी त्यासाठी तर्ककठोर वाटणारा, परंतु तरीही समोरच्याला त्याची चूक समजावून सांगून ती चूक समजल्यानंतर त्याच्या पाठीशी उभा राहणारा असा हा एक अत्यंत वेगळा माणूस आहे.”
खरंतर सुरुवातीच्या काळात केवळ पुस्तकांमुळे झालेली ही मैत्री दोन कुटुंबांमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने वृद्धिंगत होत गेली आहे. आज माझ्या मुलाला सोहिरला कायम स्निग्धाताईचा सल्ला घ्यावासा वाटतो… ऍडमिशन घेताना किंवा नोकरीला ॲप्लीकेशन करताना तो स्निग्धाताईशी बोलून निर्णय घेतो याचे आम्हाला विलक्षण समाधान आणि अप्रूपही आहे. दिवसभरात एकदा तरी त्याच्या तोंडातून स्निग्धाताई हे येणारं नाव ही आमच्या या लोकविलक्षण नात्याची पावतीच म्हणावी लागेल. लोकेश दादासोबत मी जरी कायम बरोबरीच्या नात्याने वाद घालत असलो तरी सतत तंत्रज्ञानामुळे स्वतःला अपग्रेड करणे, बदलत्या सामाजिक- राजकीय परिस्थितीचा सतत विचार करणं, माणूस म्हणून आपण नेहमी चुका करत असतो -चुकीचं वागत असतो, वाईट वागत असतो त्यात सुधारणा करणं, आपण आपल्या स्वभावातला करडेपणा किंवा अपारदर्शकता ही टाळायची असते आणि स्वतःला सतत नितळ करायचं असतं, त्यासाठी प्रसंगी आत्मवंचनाही पत्करावी लागते हे त्याचे मुद्दे मात्र मला शतशः मान्य आहेत.
आपण स्वतःला आरशात पाहताना कायम स्वतःच्या नजरेला नजर देत आपल्या आत खोल पाहिले पाहिजे ही त्याची भूमिका कुणालाही सहज पचण्यासारखी नाही…आपली छोटीशी जरी चूक झाली तरी फोन करून आपल्यापेक्षा वयाने, अधिकाराने कितीही लहान व्यक्तीला प्रांजळपणे सॉरी म्हणणारा फोन करताना त्याला मी अनेकदा पाहिलं आहे, अनुभवलं आहे. (….सुरुवातीला एकदा उत्साहाच्या भरात कुणाशीतरी मी त्याची ओळख ‘हे उद्योगपती लोकेश शेवडे’ अशी करून दिली, तेव्हा ‘मी उद्योगपती नाही ,उद्योजक आहे’ अशी ताबडतोब दुरुस्ती त्याने केली) कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत या संपूर्ण कुटुंबाकडून…आम्ही बरंच काही शिकण्याचा प्रयत्न केला, कदाचित त्यांनी केलेल्या लाडाने आम्ही थोडे बिघडलोसुद्धा आहोत कारण मायेची अशी ऊब ,अख्ख्या घरादाराची, इतक्या मोठ्या घराची सावली आपल्यावर आहे म्हटल्यानंतर माणूस थोडा बिंदास, थोडा बेदरकार होतो किंवा होणारच पण आम्हाला सतत स्वतःकडे तटस्थपणे पाहायला लावणारं, रागावणारं आणि मायेने चिंब चिंब भिजवून टाकणारं हे घर, या घराशी असलेला आमचा स्नेह हा कायम रहावा किंबहुना तो तसा राहिलंच याची खात्री आहे…
शेवडे कुटुंबियांना त्यांच्या सगळ्या उद्योगांमध्ये लोकविलक्षण कीर्ती, प्रगती, समृद्धी साध्य होवो, वृद्धिंगत होवो ही सरगमच्या 45 व्या वर्धापनदिनानिमित्त मनापासून प्रार्थना आणि सरगम परिवाराला सुवर्ण महोत्सवाच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
– आनंद क्षेमकल्याणी